सत्यध्येय एकविचार
शिंदखेडा (प्रतिनिधी – यादवराव सावंत)
शिंदखेडा तालुक्याच्या मुख्यालयातील तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या शासकीय इमारती उभ्या असतानाही पिण्याचे स्वच्छ पाणी, वापरासाठी खुले शौचालय आणि स्वच्छतेसारख्या अत्यावश्यक सुविधाच उपलब्ध नसल्याने नागरिक, शेतकरी आणि रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.या प्रशासकीय अनास्थेविरोधात शिंदखेड्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अरुणदादा देसले यांनी त्यांच्या ‘गांधीगिरी भाग ११’ अंतर्गत अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. त्यांनी तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयातील कुलूपबंद आणि अस्वच्छ शौचालयांना फुलमाळा अर्पण करून प्रशासनाला जणू लाजेचा आरसाच दाखवला.
तहसील कार्यालयात शौचालयांना कुलूप; बाहेर घाणीचे साम्राज्य
तालुकाभरातून दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र पुरुषांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाला कुलूप ठोकण्यात आल्याचे दिसून आले. परिसरात सर्वत्र थुंकी, घाण आणि दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. “स्वच्छ भारत”च्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाची ही वस्तुस्थिती संतापजनक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; पिण्याच्या पाण्याचाही अभावउपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याने रुग्णांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्याच दिवशी गांधीगिरीचा प्रहार
योगायोगाने याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांचा शिंदखेडा दौरा असल्याने अरुणदादा देसले यांनी ही संधी साधत प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. शांततापूर्ण आणि गांधीवादी मार्ग स्वीकारत त्यांनी कुलूपबंद शौचालयांना फुलमाळा अर्पण केल्या. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली.
“इमारती उभ्या केल्या; पण सुविधा कुठे?”
यावेळी बोलताना अरुणदादा देसले म्हणाले,”कोट्यवधी रुपये खर्च करून शासकीय इमारती उभारल्या जातात; पण नागरिकांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छ शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देता येत नसतील, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? या फुलमाळा म्हणजे सन्मान नव्हे, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मारलेली चपराक आहे. या आंदोलनातून तरी संबंधित अधिकाऱ्यांना सद्बुद्धी सुचेल, अशी अपेक्षा आहे.”
प्रशासन जागे होणार की पुन्हा आश्वासनांचा पाऊस?
‘गांधीगिरी भाग ११’ मुळे शिंदखेड्यात या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता प्रशासन तातडीने शौचालयांची कुलूपे उघडून स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार की पुन्हा केवळ आश्वासनांवरच वेळ मारून नेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.अरुणदादा देसले यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल.”
![]()
