सत्यध्येय एकविचार
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :
शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे गावाच्या हद्दीतील तापी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध आणि बेसुमार वाळू उपशाविरोधात अखेर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू उत्खननामुळे नदीपात्राचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा लागले, जेव्हा कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचलेल्या महसूल अधिकाऱ्यालाच काही संशयितांनी धक्काबुक्की केल्याचा, त्यांचा मोबाईल हिसकावून त्यातील अवैध वाळू उपशाचे व्हिडिओ डिलीट केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून वाळू माफियांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून वरपाडे गावाजवळील तापी नदीपात्रातून दररोज अंदाजे ३० ते ३५ ट्रॅक्टरद्वारे कथित अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांचे मनोबल वाढल्याचा आरोप होत आहे. सततच्या उत्खननामुळे नदीपात्राची झपाट्याने हानी होत असून भविष्यात भूक्षरण, पूरस्थिती आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या प्रकाराला कंटाळून गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी थेट नदीपात्रात जाऊन सुरू असलेल्या वाळू उपशाला विरोध केला. ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि एकजूट पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाळू तस्करांनी ट्रॅक्टरसह तेथून पळ काढल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने महसूल विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच संबंधित महसूल अधिकारी पंचनामा आणि पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तेथे काही संशयितांनी सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून त्यामधील अवैध वाळू उपशाचे व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनाही गंभीर परिणामांची धमकी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सरकारी अधिकाऱ्यांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे संरक्षण कोण करणार, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तापी नदीपात्रातील कथित अवैध वाळू उपसा तातडीने कायमस्वरूपी बंद करावा, साठवून ठेवलेली वाळू जप्त करावी, सरकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या तसेच ग्रामस्थांना धमकावणाऱ्या संबंधितांविरुद्ध कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शिंदखेडा पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी अॅड. वसंत पाटील, राहुल पवार, संदीप पवार, संदीप कोळी, प्रकाश पवार, महेंद्र चित्ते, गणेश पवार, रामसिंग गिरासे, भिका खैरनार, भारत गिरासे, बंटी चौधरी, गोलू पवार, समाधान कोळी, राकेश पवार, सुनील गिरासे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.आता या गंभीर प्रकरणाची महसूल व पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने चौकशी करते, संबंधितांवर कोणती कायदेशीर कारवाई होते आणि तापी नदीपात्रातील कथित अवैध वाळू उपशाला कायमचा आळा बसतो का, याकडे संपूर्ण शिंदखेडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
![]()
