सत्यध्येय एकविचार
धुळे | प्रतिनिधी
टोल नाक्यावर वाहन सोडण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार शरद पाटील यांनी संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत टोल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शासनाच्या नियमांनुसार लोकप्रतिनिधींना टोलमाफीची सुविधा असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक अरेरावी केली आणि ओळखपत्राची पडताळणी होऊनही वाहन पुढे जाऊ दिले नाही, असा दावा त्यांनी केला आहे.पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ते आपल्या वाहनासह टोल नाक्यावर पोहोचले असता त्यांनी अधिकृत ओळखपत्र कर्मचाऱ्यांना दाखविले. ओळखपत्राची खातरजमा करूनही कर्मचाऱ्यांनी वाहन सोडण्यास टाळाटाळ केली. उलट वाद घालत नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी अडवणुकीची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरद पाटील यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडत, “लोकप्रतिनिधींनाच जर अशा प्रकारे वागणूक मिळत असेल, तर सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल, याची कल्पना करता येते,” असे वक्तव्य केले.तसेच, टोलनाका कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांशी सन्मानाने वागावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर टोलनाका व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
![]()
