सत्यध्येय एकविचार
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
धुळे वाडीभोकर रोड, देवपूर येथील श्रीराम मंदिर परिसर येथे स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा धुळेतर्फे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र संचालक प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना प्राचार्य डॉ. गिरासे म्हणाले की, “स्वामी विवेकानंद हे भारताचे एक महान तत्त्वज्ञ, संन्यासी, समाजसुधारक व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आध्यात्मिक जनक होते. त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाचा सखोल परिचय करून दिला. सन १८९३ मधील शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील त्यांच्या ऐतिहासिक भाषणाने भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सातासमुद्रापार पोहोचवले.”पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी महासमाधी घेतली. त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवा आणि मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित होते. आजच्या आधुनिक काळातही त्यांच्या विचारांची, देशभक्तीची आणि शिकवणीची समाजाला व विशेषतः तरुणांना नितांत गरज आहे.या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. यु. जी. पाटील, प्रा. बाविस्कर, प्रा. राहुल भदाणे, श्री. भगवान बागुल तसेच मीनाक्षीताई जोशी, शर्मिलाताई गुजराथी, आशाताई पटेल, लताताई, यमुनाताई सोनार, विजयाताई चौधरी, मंगलाताई चौधरी, कुसिमताई कलाल, सुनिताताई चौधरी, कमलताई पवार, इंदूताई सोनवणे आणि शकुंतलाताई बहाळकर आदींसह परिसरातील नागरिक आणि विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
