शिरपूर/— गो मातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यासह विविध मागण्यांसाठी दि. २७ एप्रिल रोजी शिरपूर शहरात भव्य ‘गो-सन्मान रॅली’ काढण्यात आली. या रॅलीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. उत्स्फूर्त वातावरणात निघालेल्या या रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘गो-सम्मान अभियान’च्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता पाटीलवाडा येथील शिव स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.
रॅलीने कुंभारटेक, नगरपालिका रोड, आदर्श नगर मार्गे मार्गक्रमण करत तहसील कार्यालय गाठले. तेथे नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात गो मातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देणे, केंद्रीय गोसेवा व संरक्षण कायदा लागू करणे, सर्व कत्तलखाने बंद करणे, स्वतंत्र गोमाता मंत्रालय स्थापन करणे, गो मातेला संपूर्ण संरक्षण देणे, विधिवत सेवेचा अधिकार देणे तसेच दि. २७ एप्रिल हा ‘गो माता सन्मान दिन’ म्हणून जाहीर करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी डॉ. अतुल बडगुजर, उपनगराध्यक्षा सौ. संगीता देवरे, आरोग्य सभापती सौ. वृषाली बडगुजर, श्रीमती अर्चना हासवाणी, श्रीमती छाया पाटील, डॉ. सरोज पाटील, शिवसेनेचे भरतसिंग राजपूत, डॉ. दीपक गिरासे यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या मागण्यांना बळकटी देण्यासाठी शहरात गेल्या दोन दिवसांपासून गल्लोगल्ली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत विशेषतः महिला व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
![]()
