धुळे | प्रतिनिधी
गोमातेच्या संवर्धन, संरक्षण आणि विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणारा निधी हा केवळ शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांसाठीच वापरला जाईल. निधीच्या खर्चात अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त राखली जाईल. तसेच राज्यभरातील सर्व गोशाळांचे सखोल सर्वेक्षण करून नियमबाह्य अथवा बोगस आढळणाऱ्या गोशाळांचे अनुदान तात्काळ बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) डॉ. शेखर मुंदडा यांनी व्यक्त केली.ही माहिती ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा – महाराष्ट्र राज्य’ अंतर्गत आयोजित धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गोशाळा संचालक, गोसेवक आणि पशुपालकांच्या संवाद सभेत त्यांनी दिली. हा कार्यक्रम धुळे येथील खानदेश गोशाळा, मालेगाव रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. गिरीश पाटील, योगी दत्तनाथ महाराज (गुरु गोरक्षनाथ आखाडा, शिंदखेडा), नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावित, धुळे महानगरपालिकेच्या महापौर माया परदेशी, ओमप्रकाश अग्रवाल, उद्धव नेरकर, नोडल अधिकारी डॉ. मनोज पाटील, कार्यक्रम संयोजक पवन पोद्दार, राजेंद्र चोरडिया, मीना भोसले, मनोज सोनवणे, दामोदर विठ्ठल नाईक यांच्यासह अनेक गोशाळा संचालक, पशुपालक व गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले की, गोसेवा आयोगाचा उद्देश केवळ अनुदान वाटप नसून गोसंवर्धनाची सक्षम आणि पारदर्शक व्यवस्था उभारणे हा आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय, गैरवापर किंवा नियमबाह्य खर्च कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रत्येक रुपयाचा हिशेब आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग सुनिश्चित करण्यासाठी आयोग अधिक सक्षम यंत्रणा उभारणार आहे.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत राज्यात ५ लाख गणेश गोमय मूर्ती विक्रीचा संकल्प जाहीर केला. गोमय उत्पादनांद्वारे ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.योगी दत्तनाथ महाराज यांनी गोमातेचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व अधोरेखित करत गोमय व गोमूत्र आधारित उत्पादनांच्या वापरातून नैसर्गिक शेती, पर्यावरण संरक्षण आणि मानवी आरोग्याला होणारे लाभ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सभेत उपस्थित विविध मान्यवरांनी गोसंवर्धन, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शासन, गोशाळा संचालक आणि समाज यांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी पाटील यांनी केले, तर नंदुरबार जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. संजय खाचणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन खडसे, उल्हास बोराडकर, मुकुंद शिंदे, नितीन चिलवंत यांच्यासह आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
![]()
